Call Us - 7744941233 | Write To - vidyabharti.nagpur@gmail.com

विद्या भारतीची अखिल भारतीय साधारण सभा प्रारंभ

मंदसौर म.प्र. दि.8 जून

विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानची सर्वसाधारण सभा स्थानिक सरस्वती विहार शैक्षणिक संस्थान, मंदसौरच्या सैनिक विद्यालयात प्रारंभ झाली असून संपूर्ण देशभरातून सुमारे 300 प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. सभेचे उद्घाटन स्वामी वल्लभाचार्यांच्या वंशपरंपरेत जन्मलेले पूजनीय गोस्वामी दिव्येशकुमार यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, विद्या भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष डॉ.डी.रामकृष्णराव, अखिल भारतीय संघटन मंत्री गोविंदचंद्र महंत, अखिल भारतीय महामंत्री अवनीश भटनागर व सहमंत्री डॉ.मधुश्री सावजी याप्रसंगी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. तीन दिवसीय सभेत प्रारंभी दीपप्रज्वलानंतर गतवर्षीचा वार्षिक अहवाल महामंत्री अवनीश भटनागर यांनी सादर केला. गतवर्षीच्या तुलनेत कार्यवृद्धी झाली असून एकूण देशभरात 776 जिल्ह्यांपैकी 682 जिल्ह्यांमध्ये कार्य असल्याची माहिती त्यांनी दिली. 12098 औपचारिक विद्यालये, 3985 एकल शिक्षा केंद्र व 4480 संस्कार केंद्र असे मिळून एकूण 20563 शिक्षण केंद्र चालवली जात असल्याची माहिती ही त्यांनी दिली. याव्यतिरिक्त 54 महाविद्यालय व 1 विद्यापीठ विद्या भारतीतर्फे चालवली जात आहेत. संपूर्ण देशभरात 3125969 विद्यार्थी औपचारिक विद्यालयात शिकत असून 199544 विद्यार्थी अनौपचारीक शिक्षा केंद्रांमध्ये शिकत असल्याची ही माहिती त्यांनी दिली. सीमावर्ती व तटवर्ती क्षेत्रातही कार्य सुरू आहे. गतवर्षीच्या संघ लोक सेवा आयोगाच्या सिव्हिल सेवा परीक्षेत विद्या भारती पूर्व छात्रांपैकी एकूण 16 जणांची निवड झाली असून शालेय राष्ट्रीय स्तरावर खेळांच्या स्पर्धांमध्ये एकूण 1520 विद्यार्थी सहभागी झाले. खेलो इंडिया द्वारा आयोजित स्पर्धेत 5 विद्यार्थी कुस्तीमध्ये विजयी झाले. चांद्रयान -3च्या प्रमुख वैज्ञानिकांपैकी 9 वैज्ञानिक हे विद्या भारतीच्या शाळांमधील माजी विद्यार्थी आहेत असेही भटनागर म्हणाले.

सभेमध्ये कार्याचा विस्तार, शैक्षणिक गुणवत्ता विकास, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या यशस्वी अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न, शैक्षणिक क्षेत्रात आणि राष्ट्रकार्यात महिलांच्या योगदानाबाबत चर्चा अशा अनेक विषयाबाबत मंथन होऊन योजना होणार आहे.

About Author


admin