Call Us - 7744941233 | Write To - vidyabharti.nagpur@gmail.com

संस्कार साधना विशेषांकाचे प्रकाशन संपन्न

हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यात आईची भूमिका महत्त्वाची – प्राचार्य रामचंद्र देशमुख

आपल्या देशात ‘मातृ देवो भव’ प्रथमतः म्हटले जाते. मूल सर्वप्रथम आईकडून शिकते.
मुलांना घडविण्यात, त्यांना संस्कारीत करण्यात, आपली हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यात कुटुंबातील आईची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे असे विचार विद्या भारतीचे प्रांत अध्यक्ष डॉ.रामचंद्र देशमुख यांनी व्यक्त केले. केशवनगर सांस्कृतिक सभेद्वारा संचालित केशवनगर माध्यमिक विद्यालयाने आयोजित केलेल्या मातृसंमेलन या कार्यक्रम प्रसंगी आणि विद्या भारतीच्या संस्कार साधना या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.
डॉ. देशमुख यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन झाल्यावर बोलतांना ते म्हणाले यंदाचा विषय भारतीय शिक्षण – परंपरा व स्वरूप हा असून या संबंधित विषयांवरील अंकात प्रसिद्ध झालेले लेख वाचनीय आहेत तसेच अंक मार्गदर्शनपर आणि संग्राह्य आहे.
यावेळी व्यासपीठावर केशवनगर सांस्कृतिक सभेचे अध्यक्ष सुनील काशीकर, सचिव प्रकाश देशपांडे, विद्या भारती महानगर अध्यक्ष शैलेंद्र मानावत व शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भाकरे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला केशवनगर सांस्कृतिक सभेचे पदाधिकारी, विद्या भारतीचे पदाधिकारी, शाळेतील शिक्षक वृंद तसेच महिला पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली.कार्यक्रमाचे संचालन प्रांत सह मंत्री रोशन आगरकर यांनी केले, वैयक्तिक गीत सौ. निनावे यांनी गायले तर आभार महानगर मंत्री संदीप पंचभाई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धारणा खळतकर, वैजयंती पंडे, अंकेश साहू, नितीन चौबे, मेघा कुलकर्णी, संध्या अग्निहोत्री यांनी परिश्रम घेतले.

About Author


admin