Call Us - 7744941233 | Write To - vidyabharti.nagpur@gmail.com

प्रधानाचार्याने स्वतःच्या विकासाचा आराखडा तयार करावा- डॉ.मधुश्री सावजी

नागपूर दि.16 जून

विद्या भारतीच्या प्रधानाचार्य अभ्यास वर्गाचे उद्घाटन थाटात

शिक्षण सोप्याकडून कठीणाकडे नेते, मूर्ताकडून अमूर्ताकडे नेते, प्रतिकूलतेकडून चांगल्या मनस्थितीकडे नेते. भयाकडून निर्भयतेकडे जाणे हा शिक्षणाचा परिणाम असतो. आई-वडिलांनी पाल्याच्या रूपात संभावनांना जन्म दिला आहे त्याला रूप देणे हे प्रधानाचार्याचे कर्तव्य आहे. आपल्याला किती कामे करायची व ती कधी करायची याची यादी त्याने केली पाहिजे. प्रधानाचार्य हा प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद देणारा हवा. त्याचे अनुकरण सगळे आचार्य करतात. त्यामुळे प्रधानाचार्याने स्वतःच्या विकासाचा आराखडा तयार करावा असे प्रतिपादन विद्या भारतीच्या अखिल भारतीय मंत्री डॉ.मधुश्री सावजी यांनी केले. स्थानिक डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात प्रारंभ झालेल्या प्रधानाचार्य अभ्यास वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर क्षेत्र मंत्री शेषादद्रि डांगे, प्रांत उपाध्यक्ष सौ. प्रांजलीताई जोशी, नागपूर महानगर अध्यक्ष शैलेंद्र मानावत उपस्थित होते.
दीप प्रज्वलनानंतर अभ्यास वर्गाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करतांना प्रांत संघटन मंत्री शैलेश जोशी म्हणाले प्रत्येक जण आपापल्या सुरक्षा कवचात असतो. त्यातून बाहेर पडले पाहिजे. त्याशिवाय प्रगती होणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी प्रधानाचार्यांना योजना आखायची असल्यामुळे धोरणातील विशेष पैलू जसे भारतीय पंचपदी शिक्षा पद्धती समजणे, प्रधानाचार्यां समोरील आव्हाने व समाधान, प्रधानाचाऱ्यांचे व्यक्तिगत जीवन, वेळेचे नियोजन अशा अनेक विषयांवर सत्र आयोजित केली आहेत. या विविध विषयांचा निश्चितच उपयोग सर्वांना होईल असेही ते म्हणाले.
विदर्भातील विद्या भारतीशी संलग्न विद्यालयांच्या सुमारे 50 प्रधानाचार्यांची अभ्यास वर्गात उपस्थिती आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशवनगर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रधानाचार्य मिलिंद भाकरे यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभी सरस्वती वंदना सौ. वैशाली सालोडकर यांनी गायिली. आभार प्रदर्शनाने उद्घाटन सत्राची सांगता झाली.

About Author


admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *